ठसा – संगीत सिव्हन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

दक्षिणेकडील कन्नड, तामीळ, तेलुगू व मल्याळम या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शक हिंदीत येणे हीदेखील दीर्घकालीन परंपरा आहे. श्रीधर (‘दिल एक मंदिर’), के. बालचंदर (‘एक दुजे के लिए’), के. विश्वनाथ (‘सरगम’), के. भाग्यराज (‘आखरी रास्ता’) याच परंपरेतील आणखी एक नाव पटकथाकार व दिग्दर्शक संगीत सिव्हन. त्याचे 8 मे रोजी मुंबईत वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुपम खेर, सनी देओल, तुषार कपूर, रितेश देशमुख यांनी ट्वीट करीत त्याला श्रद्धांजली अर्पण केली. ‘संगीत सिव्हन’ हे नाव मी सर्वप्रथम ऐकले ते आपल्या लक्ष्मीकांत बेर्डेकडून. लक्ष्मीकांत बेर्डे मराठीबरोबरच हिंदीतही भूमिका साकारत असतानाच त्याने एकदा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मुलाखतीसाठी बोलावले. 1998ची ही गोष्ट. तेव्हा ‘जोर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि त्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता हाच संगीत सिव्हन. अतिशय शांतपणे तो सनी देओल, सुष्मिता सेन, गोविंद नामदेव यांना दृश्य समजावून सांगत होता. आपल्याला दृश्य नेमके कसे हवे, याबाबत तो अतिशय पह्कस्ड होता. ‘जोर’मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, मिलिंद गुणाजी यांच्याही भूमिका होत्या.

संगीत सिव्हनची आणखी एक ओळख म्हणजे तो दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचा छायाचित्रणकार संतोष सिव्हनचा भाऊ, पण संगीत सिव्हनला स्वतःची ओळख होती. त्याने ऐंशीच्या दशकात मुंबईत येऊन बासू भट्टाचार्य यांचा मुलगा आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शित ‘राख’ या चित्रपटाच्या वेळेस कार्यकारी निर्माता म्हणून चित्रपट व्यवसायात पाऊल टाकले आणि हे माध्यम व व्यवसाय शिकून घेण्याची भावना कायम ठेवली. त्याने मसालेदार मनोरंजक चित्रपट हे आपले कार्यक्षेत्र मानले आणि अतिशय संयमाने बोलणे व वागणे तसेच आपल्या कामाचा स्वतः आनंद घेत इतरांनाही त्यात सामील करून घेणे हे आपले वैशिष्टय़ जपले. ‘व्यूहम’ ( 1990) हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला मल्याळम चित्रपट. त्यानंतर त्याने ‘वोधा’, ‘निरंजन’, ‘जॉनी’, ‘डॅडी’, ‘गंधवर्धम’, ‘इडियट्स’, ‘ई’ अशा अनेक मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचा कामाचा झपाटा उत्तम होता. मोहनलाल, हीरा राजगोपाल, उर्वशी, सिद्धार्थ लामा इत्यादी अनेक कलाकार त्याच्या चित्रपटात होते. दक्षिणेकडील अनेक दिग्दर्शकांप्रमाणे तोदेखील हिंदीत आला. हिंदीत त्याने ‘चुरा लिया है तुमने’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘एक-द पॉवर ऑफ लव्ह’, ‘क्लिक’, ‘क्या कूल है हम’, ‘यमला पगला दीवाना-2’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करतानाच अनेक कलाकारांशी त्याचे चांगले संबंध निर्माण झाले आणि म्हणूनच त्याच्या निधनाच्या वृत्ताने अनेक कलाकार हळहळले. आताही तो ‘रामचंदम’ या मल्याळम चित्रपटाची ‘कपकप्पी’ या नावाने हिंदीत रिमेक करीत होता. आपल्या चित्रपट दिग्दर्शनात तो कार्यरत असतानाच तो आजारी पडला आणि दुर्दैवाने त्याचे निधन झाले.

– [email protected]