>> अनघा सावंत
‘रेझिन आर्ट’ हा कलेचा एक अनोखा आणि आगळावेगळा प्रकार सध्या अनेकांना आकर्षित करत असून तो लोकप्रियही होत आहे. मोबाइल कव्हर, दागिने, फोटोफ्रेम, पेपरवेट, दिवाळीसाठी लागणारे दिवे, राखी, बुकमार्क, घडय़ाळे, की-चेन अशा विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू रेझिन आणि हार्डनर हे द्रवपदार्थ वापरून बनवल्या जातात. याशिवाय हा कला प्रकार भिंती, टेबलटॉप, फरशी डिझाईनसाठीही सध्या मोठय़ा प्रमाणावर वापरला जात आहे.
पेशाने समुपदेशक असलेल्या अश्विनी कदमला लहानपणापासूनच काहीतरी कलात्मक आणि सर्जनशील करण्याची आवड होती. एक वेगळी, नावीन्यपूर्ण कला म्हणून रेझिन आर्ट शिकण्यास तिने सुरुवात केली. सुरुवातीला कुटुंबातील अनेकांना तिने रेझिन आर्टपासून बनवलेल्या कलाकृती भेट दिल्या. त्याचे फोटो व्हाट्सअॅपच्या स्टेटसला ठेवल्यावर मात्र तिला ऑर्डर्स येत गेल्या. याविषयी ती म्हणाली, रेझिन आर्टविषयी सामान्य लोकांना फार कमी माहिती आहे. रेझिन हा एक जाड, चिकट द्रव पदार्थ असून रंगहीन असतो. रेझिनबरोबर हार्डनर हा एक महत्त्वाचा द्रव पदार्थ एकत्रित करून हव्या त्या कलात्मक वस्तू बनवल्या जातात. या द्रव पदार्थाची सुसंगतता राखण्यासाठी ते विशिष्ट गुणोत्तरांमध्ये जोडले जातात. कधी कधी त्यात हवे ते रंग मिसळून रंगीबेरंगी डिझाईनही तयार करता येते. सुकलेली फुले, टरफले किंवा वेगवेगळ्या वस्तूंच्या साच्यामध्ये ओतले जाऊन आकर्षक अशा भेटवस्तू किंवा शोभेच्या वस्तू बनवता येतात. मात्र त्वचेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कलाकृती करताना हातमोज्यांचा वापर करणे आवश्यक आहे. रेझिन आर्टपासून वस्तू बनवताना तुमच्यात संयम असणे फार आवश्यक आहे. कारण कधी 12 तास, तर कधी कधी वस्तूच्या आकारमान आणि डिझाईननुसार 24 तासही लागतात.
रेझिनचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याचा टिकाऊपणा. त्यामुळे रेझिनपासून बनवलेल्या वस्तूही अधिक काळ टिकतात. हार्डनर रेझिनपेक्षा जास्त पातळ स्वरूपात असते. मात्र वस्तूला मजबुती येण्याच्या दृष्टीने त्याची महत्त्वाची भूमिका असते. पाणी आणि इतर पर्यावरणीय घटकांमुळे रेझिनपासून बनवलेल्या वस्तूंना कोणतीही हानी पोहोचत नाही. रेझिन आणि हार्डनरला उष्ण हवामान गरजेचे असून थंड हवामानात ठेवल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. कोणत्याही प्रकारच्या चित्राला रेझिनचा मुलामा दिल्यास त्याच्या सुंदरतेत भर पडते. टी कोस्टर, नवरा-नवरीचे हार, लग्नाचे फोटोही सध्या रेझिन आर्टमध्ये बनवण्यास अनेकांची पसंती मिळत आहे.






























































