
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले करवीरचे आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील (वय – 71, रा. मुळ गाव सडोली खालसा, ता. करवीर, सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालावली. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. येथील ऍस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. पण प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत नव्हती. गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.पण अखेर त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालावली असून राजकीय तसेच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाची माहिती कोल्हापूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण आणि आमदार सतेज पाटील यांनी दिली.
“काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो”, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या… pic.twitter.com/GJkdmm4txE
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) May 23, 2024
कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणात गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ आपली वेगळी प्रतिमा तयार करत करवीर विधानसभा मतदारसंघातून सन 2004आणि 2019 असे दोन वेळा ते आमदार झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा, नुसत्या फोन वरुन लोकांची कामे करुन देणारा आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख होती.
आमदार पी.एन.पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी झाला. सडोली खालसा, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर हे त्यांचे मुळ गाव. सन 2004 मध्ये प्रथम तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी 2009 व 2014 मध्ये करवीर मधून निवडणूक लढवली. मात्र या दोन्हीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.
आमदार पी.एन.पाटील हे गेल्या चार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते. सन 1999 ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे प्रदिर्घ काळ जिल्हाध्यक्ष होते. सध्या ते महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या मध्यवर्ती सहकारी बँकेत 35 वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. 1999 पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्ष होते .तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात देखील त्यांनी 25 वर्षांहून अधिक काळ आपले वर्चस्व कायम ठेवले.आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या भोगावती साखर कारखान्याचे ते सध्या अध्यक्ष असून,त्यांच्या प्रयत्नातूनच कारखाना सुस्थितीत येत आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याची ते एकनिष्ठ होते. यामुळे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहाणे पसंत केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रति असलेल्या निष्ठेतून त्यांनी कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात साकारलेल्या राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणासाठी खास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी कोल्हापुरात आल्या होत्या. तसेच दिंडनेर्ली येथे उभारणी केलेल्या सूतगिरणीला राजीव गांधी यांचे नाव देत, अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. दरवर्षी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पी.एन.पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी कोल्हापूर ते दिंडनेर्ली सद्भावना दौड काढण्यात येते. या कार्यक्रमासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते हजेरी लावत असतात. राज्यात राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. आमदार पी.एन.पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबरच श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्षपद आहे.त्यांच्या कन्या सौ.टिना या कराडमध्ये स्थायिक आहेत. तर पत्नीचे सन 2012 मध्ये निधन झाले आहे.
मुळ गावी होणार अंत्यसंस्कार
आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास सडोली खालसा या त्यांच्या मुळगावी अंत्यदर्शना -साठी ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी एक नंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

































































