
मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक आणि चिकनच्या टेम्पोमध्ये जोरदार धडक बसून टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. अपघातानंतर टेम्पोला लागलेल्या आगीत चालक होरपळून मृत्यू झाला. अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पो ट्रकला धडकला. ट्रकला धडकल्यानंतर टेम्पोला भीषण आग लागली. टेम्पो चालकाला बाहेर पडता न आल्याने तो आगीत होरपळल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पोलीस आणि बचाव पथकाने गॅस कटरने टेम्पो कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस अपघाताचा सखोल तपास करत आहेत.