
श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधिमंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता ‘श्रीं’ची काकड आरती झाल्यानंतर ‘श्रीं’ची प्रतिमा, पोथी व वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थानचे तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालिमठ यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा घेऊन, तर सीईओ गोरक्ष गाडिलकर व विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे अधिकारी प्रज्ञा महांडुळे–सिनारे, विष्णू थोरात, तुषार शेळके यांच्यासह ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे ‘श्री साईसच्चरित’ ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सालिमठ यांनी प्रथम अध्याय वाचून केला. यावेळी प्रज्ञा महांडुळे, गोरक्ष गाडिलकर, तुकाराम हुलवळे, अभयकुमार दुनाखे यांनीही पोथीवाचन केले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ व त्यांच्या पत्नी मीनाक्षी सालिमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली.
दुपारी 12.30 वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेचे वाणिज्य महादूतावास माइक हँकी यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. सायंकाळी ह.भ.प. मंदार व्यास (डोंबिवली) यांचा कीर्तन, सायंकाळी श्रींची धूपारती, सायंकाळी प्रशांत भालेकर (मुंबई) यांचा ‘स्वरधुनी’ साईगीतांचा कार्यक्रम, रात्री 9.15 वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारायणासाठी द्वारकामाई रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. अमेरिका येथील साईभक्त सुभा पै. यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व साईराज डेकोरेटर्स (मुंबई) यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. उद्या (21 रोजी) उत्सवाचा मुख्य दिवस असून, पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.