अक्कलकोटमध्ये 5 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज, उत्सवावर पावसाचे सावट

श्री दत्तगुरूंचे अवतार श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री वटवृक्ष स्वामी मंदिर, समर्थ अन्नछत्र मंडळ, समाधी मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. मंदिरात विविध फुलांनी सजावट व अन्नछत्र मंडळ विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. स्वामीभक्तांच्या स्वागतासाठी स्वागतकमानी, डिजिटल फलक, भगव्या पताकांनी तीर्थक्षेत्रनगरीची शोभा वाढली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवासाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारपासून पाऊस सुरू असून, उत्सवावर पावसाचे सावट आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवासाठी अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विद्युतरोषणाईने सजले आहे. वटवृक्ष देवस्थान, समाधी मठ आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे. स्वामीभक्तांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र फुलले असून, स्वामीनामाचा जयघोष सुरू आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो स्वामीभक्तांसाठी महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्री निवास, यात्री भुवन, प्रशस्त वाहनतळ स्वामीभक्तांच्या सोयीसाठी सज्ज आहे. दरम्यान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या भव्य पाचमजली नूतन महाप्रसादगृह इमारतीचे भूमिपूजन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आज (21 रोजी) होणार आहे.