क्षेत्र नृसिंहवाडीत चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न

गेल्या चार दिवसांपासून शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे त्याचबरोबर कोयना, चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज शनिवारी दुपारी या वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला.

दक्षिणद्वार सोहळ्याची बातमी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे वाऱ्यासारखी पसरल्याने तसेच शनिवार, रविवार सुट्टी आणि रविवारी गुरुपौर्णिमा यानिमित्ताने श्री दत्त दर्शनासाठी ठिकठिकाणाहून हजारो भाविकांची गर्दी केली. त्यात आज दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद लुटून पवित्र स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार झाल्याने येथील दत्त देव संस्थानमार्फत भाविकांना स्नानाचा लाभ व्हावा, यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, सातत्याने पाणीपातळी वाढल्याने शनिवारी दक्षिणद्वार सोहळा झाल्याने भाविकांसाठी ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती दर्शनासाठी मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.