‘आषाढी’त 200 कोटींची उलाढाल, ग्राहकांच्या रूपात ‘विठ्ठल’ भेटल्याची व्यापाऱ्यांची भावना

यंदा जूनच्या सुरुवातीलाच राज्यभर चांगला पाऊस झाला. शेतात पिके जोमाने डोलत आहेत. त्यामुळे वारीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. सुमारे 16 लाख भाविकांनी यंदाच्या वारीत हजेरी लावली. भाविकांची संख्या वाढल्याने प्रसादिक साहित्य, फोटो फ्रेम, पेढा, ‘श्रीं’च्या मूर्ती, कुंकू-बुक्का, हॉटेलचे पदार्थ विक्रीतून सुमारे दोनशे कोटींची उलाढाल झाली. स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर बाहेरगावाहून आलेल्या व्यापाऱ्यांनीही ग्राहकांच्या रूपात ‘विठ्ठल’ भेटल्याची भावना व्यक्त केली.

यंदा चांगला पाऊस झाल्याने आषाढी यात्रेला दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या वाढणार, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यानुसार लाखो भाविक पडत्या पावसातही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व शेकडो पालख्या व दिंड्यांसमवेत पंढरपूरकडे येत होते. त्यामुळे आषाढी यात्रा मोठी भरणार, असा अंदाज घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात माल दुकानांमध्ये भरला होता. कुंकू-बुक्का, पेढे, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो, पितळेच्या मूर्त्या, फायबरच्या मूर्त्या, तुळशी माळ, टाळ, मृदंग, वीणा, पखवाज, खेळणी याला भाविकांकडून जास्त मागणी होत होती. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, भक्तिमार्ग या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांची कायमस्वरूपी दुकाने, हॉटेल्स होती, तर शहरातील स्टेशन रोड, गांधी रोड, बुरुड गल्ली रोड, चप्पल लाईन, टिळक स्मारक, गोपाळपूर रोड, संतपेठ, सांगोला चौक, भोसले चौक रोड, सरगम चौक ते इसबावी रोड, 65 एकर परिसर रोडवर स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी दुकाने, स्टॉल्स उभारले होते, तर फेरीवाले सर्वच रस्त्यांवरून फिरत होते.

यंदा पाऊस चांगला झाला आहे. तर, यात्रेत पावसाने तीन दिवस उघडीप दिली. त्यामुळे भाविकांची संख्या लक्षणीय होती. अपेक्षेप्रमाणे तांबा, पितळेच्या मूर्तींची विक्री झाली आहे. त्यामुळे ही वारी सार्थकी लागली आहे.

-प्रवीण गंजेवार, तांबा-पितळ मूर्तींचे व्यापारी

आषाढी वारी चांगली भरली होती. भाविकांकडूनही प्रासादिक साहित्याची चांगली मागणी होत होती. अपेक्षित विक्री झालेली आहे. गोपाळकाल्यापर्यंत भाविकांची गर्दी असते. त्यामुळे आणखी विक्री होणार असल्याने समाधानी आहे.

– पिंटू भोसले, व्यापारी, प्रासादिक साहित्य भांडार

पावसाने साथ दिल्याने व्यापारी खुशीत

ज्या अपेक्षेने माल भरला, त्या अपेक्षेने विक्रीदेखील झाली असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यात्राकाळात दशमी, एकादशी व द्वादशीला पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उलाढाल झालेली आहे. खरेदीसाठी भाविक रस्त्यावर उतरले, तर रस्त्यावर स्थानिक व्यापाऱ्यांसह परगावाहून आलेल्या व्यापाऱ्यांचाही चांगला धंदा झाला आहे. उरला सुरला माल गोपाळकाल्यापर्यंत विक्री होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. बाहेर गावाहून आलेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी थाटलेल्या दुकानातून मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळेच पंढरपूरचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे, ती आषाढी यात्राकाळात पंढरपुरातील व्यापाऱ्यांना ‘विठ्ठल’ पावल्याची भावना व्यक्त केली.