
>> दिलीप ठाकूर
काळ बदलला असला तरी समाजावरचा जुन्या गीत संगीताचा प्रवास व प्रभाव आजही कायम आहे, हे प्रदर्शनास सज्ज झालेल्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटावरून लक्षात येते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या 113 वर्षे जुन्या अशा ‘मानापमान’ या अभिजात नाटकावरून प्रेरित या चित्रपटात 14 गाणी आहेत.
आम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, प्रभात फिल्म कंपनी निर्मित व विष्णुपंत दामले आणि साहेबराव फत्तेलाल दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ (1936) या चित्रपटात एकूण 29 गाणी होती. काही गाणी पूर्ण लांबीची तर काहींचा केवळ मुखडा होता. यात तुकारामाचे काही मूळ अभंग होते, तर काही गीते शांताराम आठवले यांची होती.
गीत, संगीत व नृत्य हे आपल्या देशातील मराठीसह सर्वच प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे वैशिष्टय़. जगभरातील चित्रपट संस्कृतीतील आपल्या चित्रपटांचे वेगळेपण म्हणजे त्यातील गीत- संगीत. आपल्या देशातील सर्वच जातीधर्मातील सण संस्कृतीत या गीत, संगीत, नृत्याचा सहभाग आणि त्याचेच जणू प्रतिबिंब चित्रपटात पडले आहे. आपल्या देशात मूकपटाकडून बोलपटाकडे प्रवास होताना मूकपटाच्या काळात नाटकाचा प्रभाव कायम होता आणि पौराणिक कथांसह मोठय़ाच प्रमाणावर गीत-संगीत महत्त्वाचे होते. प्रभात फिल्म कंपनी निर्मित व चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट (1932). त्यावेळी चित्रपट बोलू लागला. यात 15 गाणी होती. संवादापेक्षा गाण्याच्या माध्यमातून व्यक्तिरेखा एकमेकांशी बोलताना दिसल्या. याला गोविंदराव टेंबे यांची गीते व संगीत होते.
आज हा फ्लॅशबॅक एका विशेष कारणास्तव आहे. सुबोध भावे अभिनित व दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात चौदा गाणी आहेत. (हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहे) हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या 113 वर्षे जुन्या अशा ‘मानापमान’ या अभिजात नाटकावरून प्रेरित हा चित्रपट आहे. संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी या चित्रपटासाठी एकूण 14 गाणी संगीतबद्ध केली. ह्या गाण्यांना 18 गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषिकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिला आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.
मराठीत संगीत नाटकांची खूपच मोठी परंपरा. अनेक संतपट, पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटात पूर्वी अनेक गाणी असत. यशवंत कोठारे दिग्दर्शित ‘संत सखुबाई’ (1932) पंधरा गाणी, भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘श्यामसुंदर’ (1932) एकोणीस गाणी, व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘माया मच्छिंद्र’ (1932) एकोणीस गाणी, भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘कालियामर्दन’ (1935) चौदा गाणी, व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ (1935) पंधरा गाणी, बाबूराव पेंटर दिग्दर्शित ‘साध्वी मीराबाई’ (1937) सतरा गाणी. (बालगंधर्व यांनी स्री वेषात सादर केलेला एकमेव चित्रपट), भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘कान्होपात्रा’ (1937) सोळा गाणी अशी काही संगीतमय महत्त्वाची उदाहरणे. गीत-संगीताचा आनंद घेणाऱया रसिकांनी अनेक चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. कालांतराने सामाजिक तसेच लावणीप्रधान चित्रपटांच्या युगात अनंत माने दिग्दर्शित ‘केला इशारा जाता जाता’ (1965) मध्ये पंधरा तर व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (1972) मध्ये दहा गाणी होती. ही सर्वच्या सर्व गाणी आजही लोकप्रिय आहेत. गाण्यांसाठी असे चित्रपट रसिकांनी पुनः पुन्हा पाहिले. ‘संगीत मानापमान’ हे या वाटचालीतील आणखी एक पुढचे दमदार पाऊल आहे. काळ बदलला असला तरी समाजावरचा जुन्या गीत संगीताचा प्रभाव कायम आहे. गीत-संगीत आपल्या कलेची ताकद व वैशिष्टय़ आहेच आणि ते चित्रपटाच्या नावात व विषयात असेल तर रसिक त्या दृष्टिकोनातून तो चित्रपट पाहतात आणि ते पथ्यावर पडते.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)
























































