
ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, महापालिकेचे पहिले महापौर व शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे ठाणे शहरातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राच्या घडामोडींचा महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. शिवसेना नेते म्हणून मोलाची कामगिरी करणाऱया प्रधान यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. ठाण्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान होते. उद्या सकाळी प्रधान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऐतिहासिक ठाणे शहरात आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तसेच शिवसेनेची संघटनात्मक मजबूत बांधणी करणारे सतीश प्रधान हे गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते. तसेच त्यांची प्रकृतीही नाजूक होती. दहा दिवसांपूर्वी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर उपचार सुरू असताना आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश, मुलगी अश्विनी तसेच नातवंडे असा परिवार आहे.
विकासकामांमध्ये मोठे योगदान
सतीश प्रधान यांच्या कारकीर्दीत शहरात अनेक विकासकामे झाली. दादोजी काsंडदेव स्टेडियम, ज्ञानसाधना महाविद्यालय, गडकरी रंगायतन अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू उभारण्यामध्ये सतीश प्रधान यांचा सिंहाचा वाटा होता. 1992 व 1998 मध्ये दोन वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले. त्याशिवाय शहरातील विविध सांस्कृतिक व क्रीडा विशेष संस्थादेखील त्यांनी उभारल्या. त्यांच्या निधनामुळे ठाण्याचा चालताबोलता इतिहासच हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
बाबरी आंदोलनात सहभाग
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी देशभरातून लाखो करसेवक आले होते. अयोध्या आंदोलनात तमाम शिवसैनिकांसह शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान हेदेखील सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर बाबरीचा खटला चालला तेव्हा त्यांना 31 वे आरोपी करण्यात आले होते. बाबरी आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, आचार्य गिरिजा किशोर, विनय कटियार, पवन पांडे यांच्यासह सतीश प्रधान यांनाही तुरुंगवास भोगावा लागला होता.
रमाधाम’च्या उभारणीत मोलाचे सहकार्य
सतीश प्रधान हे ‘रमाधाम’च्या उभारणीपासून विश्वस्त म्हणून कार्यरत होते. विश्वस्त मंडळाच्या पहिल्या टीममध्ये प्रधान हे अग्रस्थानी होते. ‘रमाधाम’च्या उभारणीसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रधान यांची पोकळी जाणवत राहील, अशी आदरांजली ‘रमाधाम’चे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी अर्पण केली.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने 20व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि ओजस्वी भाषणाने प्रेरित झालेल्या सतीश प्रधान यांनी वयाच्या 20 व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर टाकलेल्या विविध जबाबदाऱया प्रधान यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. वयाच्या 34 व्या वर्षी 1974 मध्ये ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यानंतर 1986 मध्ये झालेल्या पहिल्या महापौरपदाच्या निवडणुकीतदेखील त्यांनी बाजी मारली.






















































