
जोगेश्वरी पूर्व आंबोली फाटक येथील रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. यामुळे येथे मागील कित्येक वर्षांपासून राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यावस्थापकांची भेट घेऊन रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली.
पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गिका विस्तारीकरणाचे काम सुरू असून नजीकच्या काळात नवीन उपक्रमाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे रुळाच्या जवळ असलेल्या तसेच रेल्वे हद्दीतील झोपडय़ा हटविण्यात येणार आहेत. जोगेश्वरी (पू.) सोशल वेल्फेअर इंदिरानगर, आंबोली फाटक येथील झोपडीधारकांना यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र हे झोपडीधारक पुनर्वसनास पात्र असतानाही त्यांच योग्य ते पुनर्वसन करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. गेली कित्येक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार बाळा नर यांनी केली आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा नर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख पैलासनाथ पाठक, जयवंत लाड, शाखाप्रमुख मंदार मोरे, उपशाखाप्रमुख केशव चव्हाण, शाखा समन्वयक विशाल येरागी, विजय पाचरेकर, राष्ट्रवादीचे सचिन लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व अंबोली फाटक येथील रहिवासी उपस्थित होते.
आंबोली फाटक येथील 47 झोपडीधारकांचे 2000 साली मानखुर्द येथे पुनर्वसन करण्यात आले. 2013 साली 37 झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित झोपडीधारकांचे पुनर्वसन न झाल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याकडे बाळा नर यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.