
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरच्या रात्रीपासून ते 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून अवघ्या काही तासांत 11.4 मेट्रिक टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, या मोहिमेवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः हजर राहत देखरेख केली.
मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला चौपाट्या, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी रहिवासी मोठय़ा संख्येने एकत्र येतात. नववर्ष स्वागताच्या उत्साहात मोठय़ा प्रमाणात जमलेल्या लोकांसाठी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना करण्यात आल्या.
पाच हजार कर्मचाऱयांचा सहभाग
महापालिकेचे अधिकारी, कामगार, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे कामगार असे सुमारे पाच हजार कामगार या मोहिमेत सहभागी झाले होते. लिटर पिकर, जेसीबी, डंपर, बीच क्लीनिंग संयंत्र, बॉबपॅट्स, ई-स्वीपर, मिस्टिंग मशीन, कॉम्पॅक्टर इत्यादी 70 यंत्रसामग्रीचा वापर करत 11.4 मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला.
या ठिकाणी राबवली मोहीम
गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), माझगावमधील महाराणा प्रताप चौक आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जंक्शन, कलानगर जंक्शन, वांद्रे स्थानक परिसर, जुहू चौपाटी, गोराई चौपाटी, बोरिवली बाजारपेठ, अक्सा चौपाटी, मार्वे चौपाटी तसेच मानखुर्द या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
प्रकाशव्यवस्था, बॅरिकेडिंगची व्यवस्था
मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार, मरीन ड्राइव्ह ते गेटवे ऑफ इंडिया येथे आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच दुभाजकांच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले. मरीन ड्राइव्ह येथे 7 आणि गेट वे ऑफ इंडिया येथे 4 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले. मिस्ट व्हेईकल आणि लिटर पिकर या वाहनांसोबतच जेसीबी, डंपर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.