‘इस्रो’ने रचला इतिहास! स्पेडेक्स मिशन यशस्वी, नव्या वर्षात नवी कामगिरी

या नव्या वर्षात इस्रोने दमदार कामगिरी बजावली आहे. हिंदुस्थानचे स्पेडेक्स मिशन यशस्वी झाले असल्याची माहिती इस्रोने सोशल मीडियावरून दिली आहे. 2024 च्या अखेरमध्ये हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने स्पेडेक्स मिशन लाँच केले होते. हे मिशन यशस्वी झाल्याने इस्रोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अशी कामगिरी करणारा हिंदुस्थान चौथा देश ठरला आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांना या मोहिमेत यश मिळाले आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्पेडेक्स डॉकिंगचा प्रयोग 16 जानेवारीला सकाळी पूर्ण झाला आहे. चांद्रयान-4, गगन यान आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या मोहिमा या मोहिमेच्या यशावर अवलंबून होत्या. चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. गगन यान मोहिमेत मानवाला अवकाशात पाठवले जाणार आहे. इस्रोने 30 डिसेंबरला रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती.

इस्रोने काय म्हटले

स्पेसक्राफ्ट डॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले! एक ऐतिहासिक क्षण. चला डॉकिंग प्रक्रिया समजून घ्या ः अंतराळ यानामधील अंतर 15 मीटरवरून 3 मीटरपर्यंत खाली आणले गेले. डॉकिंग अचूकतेने सुरू करण्यात आले. परिणामी अंतराळ यान यशस्वीपणे कॅप्चर करण्यात आले. डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्पेस डॉकिंग यशस्वी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला. संपूर्ण टीमचे अभिनंदन! हिंदुस्थानचे अभिनंदन! डॉकिंगनंतर दोन अंतराळ यानांवर एकच वस्तू म्हणून नियंत्रण ठेवण्यात यश आले. अनडॉकिंग आणि पॉवर ट्रान्सफर चेक येत्या काही दिवसांत घेण्यात येतील.

काय आहे स्पेडेक्स मिशन

स्पेडेक्स मिशन हिंदुस्थानसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. हे मिशन पूर्ण झाल्यानंतर इस्रोच्या खात्यात आणखी एक यशस्वी कामगिरी जमा झाली आहे. या मोहिमेच्या मदतीने हिंदुस्थान अंतराळात स्वतः स्पेस स्टेशन बनवू शकतो. पृथ्वीच्या छोटय़ा कक्षेत दोन लहान अंतराळ यानांचे डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी याचा वापर होईल.