
हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत. 101 शेतकऱयांचा एक गट 21 जानेवारीला दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार असल्याची घोषणा आज शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर असतानाच एमएसपीवर पीक खरेदीची हमी करणारा कायदा देशात आणला जाईल. तसेच शेतकऱयांच्या सर्व मागण्या देशहिताच्या असून त्यांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, असे पंढेर यांनी ठणकावून सांगितले.
पेंद्राने अद्याप चर्चेसाठी तयारी न दर्शवल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. पंढेर यांनी 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या फिरोजपूर दौऱयातील सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढले. पंजाब सरकार केंद्र सरकारच्या दबावामुळे शेतकऱयांवर कारवाई करत असल्याचा आरोप पंढेर यांनी केला.