
इस्त्रोने बुधवारी सकाळी समस्त देशवासियांना आनंदाची बातमी दिली. इस्त्रोच्या १०० व्या ‘एनव्हीएस -०२’ उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले. ‘जीएसएलव्ही- एफ 15′ मोहीम फत्ते झाली आणि इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला.
सोमवारी रात्री 1.53 वाजता मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू झाले. आज सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून ‘एनव्हीएस -02′ घेऊन जाणार्या ‘जीएसएलव्ही- एफ 15′ चे यशस्वी उड्डाण झोले. इस्त्रोने ट्वीट करत जीएसएलव्ही- एफ 15/एनव्हीएस -02 मोहिम फत्ते झाल्याची माहिती दिली. इस्त्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायण यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. त्यांनी 13 जानेवारी रोजी पदभार स्वीकारलेला आहे.
जीएसएलवी-एफ 15 हिंदुस्थानच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलवी) चे हे 17 वे उड्डाण होते. इंडिजिनियस क्रायो स्टेजसह हे 11 वे उड्डाण होते. तर इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलवीचे हे 8 वे ऑपरेशनल फ्लाईट होते. जीएसएलवी-एफ 15 पेलोड फेअरिंग एक मेटेलिक व्हर्जन आहे.
इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव
इस्त्रोने मोहिम फत्ते केल्यावर अंतराळ संशोधन संस्थेवर कौतुकाचा वर्षाव झाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अभिनंदन केले. श्रीहरिकोटा येथून 100 वे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांनी इस्त्रोचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी अनुभवले सॅटेलाईट प्रक्षेपण
इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजचे ‘जीएसएलवी-एफ 15 एनवीएस-02′ हे सॅटेलाइट जियोसिंक्रोनस ट्रांसफर ऑर्बिटमध्ये ( कक्षेत) स्थापित करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली. अनेक विद्यार्थ्यांना लाँचपॅडजवळ सॅटेलाईट प्रक्षेपण अनुभवायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थी खूश होते. त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.