
बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या रुग्णालयाचे रुपांतर आता जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले आहे. मात्र हा दर्जा फक्त कागदोपत्री राहिला आहे. प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधाही येथे रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालयाची अवस्था व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निकषानुसार या रुग्णालयात 200 बेड असणे आवश्यक आहे. मात्र सध्या बेडची संख्या फक्त 30 असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
बदलापुरात सन 2012 मध्ये ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. या रुग्णालयाला 2017 मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे 30 बेडचे असलेले हे रुग्णालय 50 बेडचे होणे अपेक्षित होते. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये या रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर हे रुग्णालय 200 बेडसह डिलिव्हरी-सिझर विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस, बाह्य विभाग, सर्जरी आदींसाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असणे अपेक्षित होते. परंतु सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतरही या रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा दूरच पण बेडही आरोग्य विभागाने वाढवले नाहीत.
एक्स-रे मशीन बंद
या रुग्णालयात रुग्णालय अधीक्षकांसह 7 वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र भुलतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत. लॅब टेक्निशियन ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त असल्याने प्रतिनियुक्तीवर लॅब टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र अनेकदा ते उपलब्ध नसतात. या रुग्णालयात दोन एक्स-रे मशीन आहेत. त्यापैकी एक मशीन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध न झाल्याने धूळखात पडून आहे, असा आरोप अविनाश देशमुख यांनी केला.
दोन वर्षांपासून लिफ्टची प्रतीक्षा
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या नव्या मुख्य इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीत पहिल्या मजल्याचा वापर करताना रुग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट व रॅम्प असणे आवश्यक आहे. बांधकाम करताना इमारतीच्या आराखड्यामध्ये लिफ्ट दर्शवण्यात आली होती. मात्र आता इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप या इमारतीत लिफ्ट बसवण्यात आलेली नाही.