विजयाचा तिरंगा फडकवणार, बांगलादेशविरुद्ध जोरदार सलामी देण्यासाठी हिंदुस्थान  सज्ज

हायव्होल्टेज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेल सामन्यात बांगलादेशविरुद्ध जोरदार सलामी देत विजयाचा तिरंगा फडकवण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे. वर्षाच्या प्रारंभीच एकदिवसीय सामन्यात विजयाची हॅटट्रिक नोंदवत चॅम्पियन्सना साजेशी कामगिरी करणारा हिंदुस्थान सलग चौथ्या विजयाची नेंद करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत दररोज नवनव्या वादांना जन्म दिला जातोय आणि मग त्यांना मिटवलेही जात आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी सर्व संघाचे राष्ट्रध्वज फडकवले, पण हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळणारच नसल्यामुळे त्यांनी तिरंगा न फडकवून साऱ्यांचा रोष ओढावून घेतला. मग जगभरातून टीका झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आज तिरंगा फडकवला. पण आता हिंदुस्थानला मोठ्य़ा डौलाने दुबईत तिरंगा फडकवायचा आहे.

हिंदुस्थानच्या फलंदाजीत आघाडीच्या तीन फलंदाजांनंतर श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा असे तगडे फलंदाज आहेत. तसेच ऋषभ पंतही संघात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. प्रशिक्षक गंभीर यांनी इंग्लंडविरुद्ध राहुलला खेळता यावे म्हणून पंतची काढलेली विकेट संघाला महाग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध राहुलऐवजी पंतची वर्णी लागणार, असे मानले जातेय.

हिंदुस्थानच भारी

बांगलादेशविरुद्ध हिंदुस्थानचा संघ नेहमीच भारी ठरला आहे. त्यातच हिंदुस्थानने स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा 3-0 ने धुव्वा उडवत ‘हम भी हैं जोश में’ दाखवून दिलेय. आनंदाची बाब म्हणजे धावांच्या बाबतीत चाचपडत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बॅटला धावांचा सूर सापडलाय. या दोघांबरोबर गिल पुन्हा एकदा दिल जिंकणाऱ्या खणखणीत खेळय़ा करण्याची क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे. बुमराशिवाय हिंदुस्थानची गोलंदाजी कमकुवत भासत असली तरी बांगलादेशसमोर ती भेदकच दिसतेय. हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 42 सामने खेळले गेले असून हिंदुस्थानने 32 सामने जिंकलेत, तर बांगलादेशला केवळ 8 विजयच नोंदवता आले आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध 33 वा एकदिवसीय विजय मिळवत हिंदुस्थान आपल्या उपांत्य फेरी प्रवेशाच्या आशा अधिक बळकट करणार, हे पक्के आहे.