मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच मोदी सरकारचा उद्देश! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मुंबईतील आर्थिक केंद्रे आणि उद्योग केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुजरातसह अन्य राज्यांमध्ये पळवले. आता पेटंट मुख्यालयही मुंबईतून द्वारकेला हलवले आहे. त्यामुळे कंपन्यांना पेटंट घ्यायचे असेल तर मुंबईऐवजी दिल्लीला जावे लागणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी या पळवापळवीवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच मोदी सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितील पेटंट विभागाचे मुख्यालय गेल्या 53 वर्षांपासून मुंबईतील अ‍ॅण्टॉप हिल येथे आहे. या मुख्यालयाच्या अंतर्गत मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर येथील कार्यालयाचा कारभार पाहिला जात होता. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क मान्यतेसाठी ही कार्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी देशातून आणि काही परदेशातून एक लाखापर्यंत केंटटसाठी अर्ज येत असतात. पहिल्यांदा मुंबईतील मुख्यालय गुजरातच्या अहमदाबाद येथे हलविण्यात येणार होते, पण राजकीय विरोध लक्षात घेऊन हे मुख्यालय आता दिल्ली येथील द्वारका भवन येथे हलवण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत एक्सवर पोस्ट केली आहे. शेवटी खोटं बोलून, रेटून पुन्हा यांनी तेच केले… मुंबईचे महत्त्व कमी करणं हाच यांचा उद्देश आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.