
कुलाबा परिसरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी खोदल्यामुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोर जावे लागत आहे. हे खोदलेले रस्ते लवकरात लवकर पूर्ण करून पूर्ववत करा नाही तर आंदोलन करू, असा इशारा कुलाबावासीयांनी मुंबई महापालिकेला दिला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
कुलाबा परिसरात पालिकेने सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत. पावसाआधी हे रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे हे रस्ते आहेत त्या स्थितीत असल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी हाती घेतलेले फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेनसह इतर महत्त्वाचे रस्ते अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहेत.