महालक्ष्मी उड्डाणपूल पुढच्या वर्षी खुला होणार; ऑक्टोबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे  निर्देश

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाडये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. यातील महालक्ष्मी पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता घेऊन येत्या 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन आराखडय़ानुसार सुरू असलेल्या महालक्ष्मी परिसरातील उड्डाणपुलांच्या कामांची पाहणी बांगर यांनी आज केली. महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी पह्डण्यासाठी पालिकेच्या वतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. पाहणी दौऱ्यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या पुलाची लांबी 803 मीटर तर रुंदी 17.2 मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी 23.01 मीटर इतकी आहे तसेच उत्तरेकडे ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबी घाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी 639 मीटर आहे.

केशवराव खाडये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रुळांवरील महापालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे.

महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो.

उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी पालिकेने उड्डाणपुलाच्या रचनेत योग्य ते बदल केले आहेत.

केबल पुलासाठी 78 मीटर उंच खांब उभारणार

केबल स्टेड पुलाला आधार देण्यासाठी 78 मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदाजे 200 दिवस म्हणजेच सात महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे तसेच केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने हे काम केले जाणार आहे.