
मुंबई-गोवा महामार्गावर आज ट्रॅफिकचा अक्षरशः ‘शिमगा’ झाला. होळीचा सण साजरा करून हजारो चाकरमानी मुंबई-ठाण्याच्या दिशेने निघाले खरे… मात्र रखडलेले चौपदरीकरण, त्यातच वाहतूक पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे माणगावजवळ तब्बल आठ ते नऊ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोलाड, नागोठणे तसेच पेणमध्येही अशीच अवस्था होती. त्यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सात तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे टळटळीत उन्हात कोंडी झालेले चाकरमानी घामाच्या धारांमध्ये भिजून गेले.
            
		





































    
    




















