प्रत्येक जिह्यात आदर्श वसतीगृह उभारणार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची विधान परिषदेत माहिती

राज्यातील प्रत्येक जिह्यात एक आदर्श वसतीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यात येत असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, या ठिकाणी असलेल्या स्वयंपाकगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वसतीगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वसतीगृहात वेळेवर प्रवेश मिळावा यासाठीही नियमावली तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश आहे त्या महाविद्यालयाच्या जवळच त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळेल असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री शिरसाट यांनी दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य शशिकांत शिंदे, सचिन आहिर, जगन्नाथ अभ्यंकर, संजय खोडके यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगर येथील वसतीगृहासाठी पहिल्या टप्प्यात 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच दुसरा हप्ताही देण्यात येणार आहे. राज्यातील वसतीगृहांमध्ये 1 कोटी 25 लाख विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वसतीगृह इमारत ही 10 कोटी रुपयांची असावी असे नियोजन करण्यात आले आहे.