
राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असून स्तनदा माता, बालकांसह रुग्णांना नाश्ता, दूध, फळे आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे कंत्राट बोगस प्रमाणपत्राद्वारे मिळवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली आहे. असा घोटाळा करणारे दोन कंत्राटदार समोर आले आहेत. अशा अनेक कंत्राटदारांनी राज्यभरात अशाप्रकारे कंत्राटे मिळवली असण्याची शक्यता असून अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
राज्यभरातील विविध कंत्राटदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आणि ऑडीट करावे, अशी मागणी जय जवान जय किसान सेवा या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेतली. आरोग्य विभागाची फसवणूक करणारी कैलाश फूड किराणा स्टोअर्स ही कंपनी सध्या सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील शासकीय रुग्णालयांत आहार पुरवठा करत आहे. याप्रकरणी जय जवान जय किसान संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, संचालक, उपसंचालक यांना निवेदन देऊन संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
कंत्राट कधी रद्द करणार?
जळगाव येथील संस्थेने कैलाश फूड किराणा स्टोअर्स या कंत्राटदाराविरोधात तक्रार देऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 10 फेब्रुवारी रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात कैलाश फूड आणि किराणा स्टोअर्सचे दिलीप म्हेत्रे, राजश्री शाहू नागरी सहकारी सेवा संस्था लिमिटेडचे जनार्दन विठ्ठल चांदणे आणि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या संगीता अनिल देशपुते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांना अटकही करण्यात आलेली नाही. तसेच अद्याप कंत्राट रद्द करण्यात आलेले नाही.
कंत्राटदारांनी असे मिळवले कंत्राट
कैलाश फूड्स किराणा स्टोअर्स या कंत्राटदाराने जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा, अकोला, लातूर, पुणे आणि वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून कंत्राट मिळवले. या प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालयांकडून माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता संबंधित प्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगण्यात आले. अशाच प्रकारे यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेनेही कंत्राट मिळवले. या कंत्राटदाराने एस.एन.डी. इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, नाशिक आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी यांच्याकडे आहार पुरवठा केल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून आरोग्य विभागाकडून कंत्राट मिळवले.