
विद्याविहार येथील एका इमारतीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत एका 43 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर या आगीत तीन जण जखमी झाले. या आगीत तब्बल 20 जणांची सुटका अग्निशमन दल, स्थानिकांच्या मदतीने करण्यात आली. यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
विद्याविहार पश्चिम येथे तक्शशिला किंग्डम कॉम्प्लेक्स या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाने आग ‘लेव्हल-2’ची असल्याचे जाहीर केले. या आगीत अडकलेल्या 15 ते 20 रहिवाशांची जवानांनी सुखरूप सुटका केली. मात्र या आगीत 100 टक्के होरपळलेले उदय गांगण (43) यांचा मृत्यू झाला, तर सभजित यादव (52), कमला जैन (73), जितेंद्र जैन (46) या जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शिवसेना मदतीला धावली
आगीची माहिती मिळताच शिवसेना ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक-पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. शिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करून घेण्यासही मदत केली. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शिव आरोग्य सेना जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, संपर्कप्रमुख नंदू परुळेकर, शाखाप्रमुख महेंद्र भुते, उपशाखाप्रमुख सुरेश करकेरा, शिवसैनिक चंद्रकांत हळदणकर आदी उपस्थित होते.
सिलिंडर स्फोटाने धारावी हादरली
धारावी येथील पीएनजीपी कॉलनी येथे एका ट्रकमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरला रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. या घटनेनंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र 4 ते 5 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला अग्निशमन दलाने आग लेव्हल-1 म्हणून घोषित केले गेले. मात्र आग भडकत गेली. दलाने त्यानंतर आगीची लेव्हल-2 म्हणून घोषित केली. दलाने पाण्याचा मारा तसेच इतर यंत्रणांचा वापर करीत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला.































































