
सासरी नांदत असताना होत असलेला शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने दोन विवाहित तरुणींनी आत्महत्या करत आपले जीवन संपविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील देहरे आणि पारनेर तालुक्यातील सुपा येथे या घटना घडल्या. एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे.
देहरे येथील पूनम विशाल लांडगे (वय 28) या विवाहितेने 26 एप्रिल रोजी सकाळी घरात विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. पूनम हिचा 3 वर्षांपूर्वी देहरे येथील विशाल रावसाहेब लांडगे या लष्करी जवानासोबत विवाह झाला होता. तिला दीड वर्षाची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येनंतर तिचे वडील गोविंद गंगाधर पठारे (वय 53, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मयत पूनम हिचा नवरा विशाल रावसाहेब लांडगे, सासू सुंदरबाई रावसाहेब लांडगे, मामे सासरा जालिंदर सयाजी करांडे, मामे सासू रोहिणी जालिंदर करांडे (सर्व रा. देहरे, ता. नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बंगल्याच्या कामासाठी माहेरून 3 लाख रुपये आणावेत, यासाठी पूनम हिचा छळ सुरू होता. तसेच मामे सासरा तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी घटना सुपा येथील संभाजीनगरमध्ये घडली आहे. या ठिकाणी सोनाली गौरव वायकर (रा. सोनेवाडी, ता. नगर) हिने 26 एप्रिल रोजी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याबाबत तिची आई नंदा साहेबराव साळवे (रा. बुऱ्हाणनगर, ता. नगर) हिने सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत सोनाली हिचा पती गौरव राजेंद्र वायकर (रा. सोनेवाडी, ता. नगर) याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मयत सोनाली ही तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत व मुलीसोबत फोनवर बोलते म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत गौरव तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.