Himachal Pradesh – मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासनाकडून अलर्ट जारी

हिमाचल प्रदेशातील मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.44 वाजता मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर उपायुक्तांच्या खासगी सचिवांनी कुल्लूच्या डीसींना याबाबत माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेता कुल्लू कॉलेजमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुल्लू पोलिसांची सायबर सेल टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.

कुल्लूतील सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी संबंधितांना बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती देण्याचे आदेश कुल्लूच्या उपायुक्तांनी दिले आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सर्व विभाग प्रमुख आणि अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांच्या प्रभारी व्यक्तींना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

कुल्लू प्रशासनाला 12 तास या बॉम्बच्या धमकीच्या मेलची माहितीच नव्हती. प्रशासन संगणकातील तांत्रिक बिघाडाचे कारण देत आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी मध्यरात्री 1.44 वाजण्याच्या सुमारास हा मेल आला. पण शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्रशासनाच्या हे लक्षात आले. त्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. ईमेलमध्ये 24 तासांच्या आत कुल्लू जिल्ह्यात बॉम्बस्फोट होण्याची धमकी देण्यात आली आहे.

कुल्लू जिल्ह्यातील बॉम्बचा धोका लक्षात घेता कोणत्याही संभाव्य आपत्कालीन तैनातीसाठी त्यांच्या टीमला सतर्क ठेवण्याचे आवाहन उपायुक्त कुल्लू यांनी एनडीआरएफच्या 14 व्या बटालियन जस्सूर, नूरपूरच्या कमांडंटला केले आहे. कुल्लूच्या पोलीस अधीक्षकांना संभाव्य आपत्कालीन तैनातीसाठी राज्य आपत्कालीन पथकाला सतर्क ठेवण्याचे, तसेच कुल्लूच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन साहित्य तयार ठेवण्याचे आणि स्थानिक रुग्णालये आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.