
नालासोपाऱयात राहणाऱया एका विकृत गुजराती तरुणाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विखारी फूत्कार सोडत त्यांचा घोर अवमान केला आहे. अक्षयदीप विसावाडीया असे या महाराष्ट्रद्वेष्टय़ाचे नाव असून त्याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करत गरळ ओकली आहे. त्याच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवभक्तांनी नालासोपाऱयातील हिल ह्यू सोसायटीवर धडक देत या औरंगजेबी औलादीला लाथाबुक्क्यांनी तुडवले. विसावाडीयाला पोलिसांनी अटक केली असून त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
नालासोपारा पूर्व विजय नगर येथे हिल ह्यू सोसायटी आहे. या सोसायटी सदस्यांचा ‘आल्वेज हिल ह्यू सिटीझन्स’ नावाचा वॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर सोसायटीतील दोन सदस्यांमध्ये गुजराती व मराठी लोकांच्या भाषेवरून वाद सुरू होता. या वेळी सोसायटीत राहणारा अक्षयदीप विसावाडीया (37) याने गुजराती व मराठी भाषेवरून वाद वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नालासोपाऱयासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
मुख्यमंत्री कारवाई करणार का?
शिवपुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडवरून मोठी घोषणा केली होती. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱयांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात राहून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केले जात आहे. आता नालासोपारा येथील प्रकरणावर मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
गचांडी पकडून तुळींज पोलिसांच्या हवाली केले
सोसायटीच्या ग्रुपवरील विसावाडीयाच्या संभाषणाची क्लिप समोर येताच वसईतील सकल मराठा समाज व शिवभक्तांनी या सोसायटीवर धडक देत विसावाडीयाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही मग्रूर विसावाडीयाने वाद वाढवून शिवीगाळ केली. त्यामुळे संतापाचा कडेलोट झालेल्या शिवभक्तांनी विसावाडीयाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याची गचांडी पकडून तुळींज पोलिसांच्या हवाली केले. त्याला न्यायालयात हजर केले असून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेंडगे यांनी दिली. त्याची रवानगी ठाणे कारागृहात केली गेली आहे.

























































