भाजपकडे उद्या सत्ता नसेल तेव्हा त्यांच्या पक्षाची सूज उतरेल; संजय राऊत यांचा घणाघात

सध्याचा भाजप हा उपऱ्यांचा आणि बाहेरच्यांचा पक्ष झाला आहे. या उपऱ्यांचा भाजपच्या विचारधारेशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारे पक्ष वाढवताना भाजप नेत्यांना लाज वाटायला पाहिजे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा असे विधान केले होते. त्याचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजपने किंवा त्यांच्या अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांनी देशात किंवा महराष्ट्रात पक्ष वाढवलाच नाही. महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचे काम प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी केले आहे. तर राष्ट्रीय पातळीवर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी यांनी पक्षविस्तार केला. सध्याच्या भाजप नेत्यांनी सत्तेचा, पैशांचा मदमस्त वापर करत इतर पक्ष फोडून, आमदार, खासदार विकत घेत पक्षाला सूज आणली. त्यामुळे आजचा भाजप हा मूळचा ओरिजनल भाजप नाही. त्यांनी इतर पत्र फोडून, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत पक्ष वाढवला आहे. मात्र, उद्या त्यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा त्यांची सूज उतरलेली असेल, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

काँग्रेस पक्ष फोडा, असे विधान राज्याचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते मंत्रीही आहेत. त्यांना थोडीशीही लाज असती तर त्यांनी हे विधान केले नसते. त्यांचा पक्ष त्यांनी विचारधारेवर वाढवावा. आजचा राज्यातील भाजप हा 70 टक्के उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात, विधानसभेच तिकीट देत निवडून आणलेले, तसेच विधानपरिषदेवर घेतलेल्यांपैकी 70 टक्के लोकं बाहेरचे, उपरे आहेत. त्यांचा भाजपच्या विचारधारेशी काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीका करणाऱ्यांना ते सोबत घेत पक्ष वाढवत आहेत, याची त्यांना लाज वाटली पाहिजे. एवढे करूनही त्यांची भूक भागत नाही, फक्त फोडा आणि फोडा, हेच त्यांचे राजकारण आहे. त्यांचे नेते अमित शहा यांचीही इतर पक्ष फोडा, हीच भूमिका आहे. त्यांना स्वतःच्या विचारांची रेष वाढवता येत नाही, त्यामुळे दुसऱ्यांचे पक्ष फोडा आणि आपले वाढवा, असे त्यांचे सुरू आहे.