महाराष्ट्राची तिरंदाजीत सुवर्णासह अर्धा डझन पदके पक्की!

भागलपूर येथे सुरू असलेल्या तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसरा विजय महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. मुलींच्या तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तेजल साळवे व प्रीतिका प्रदीप यांच्यामध्ये अंतिम लढत रंगणर असून, महिलांच्या रिकर्व प्रकारातही शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांमध्येच सुवर्णपदकांची लढत रंगणार आहे. म्हणजेच ही चारही पदके महाराष्ट्राच्याच झोळीत पडणार आहेत. याचबरोबर मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या उज्वल ओलेकरने अंतिम फेरी गाठली असून, मुलांच्या कम्पाऊंड प्रकारातही मानव जाधव अंतिम फेरीत दाखल झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रासाठी ही दोन पदकेही निश्चित झाले आहे. मुलींच्या कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राची वैदेही जाधव कांस्यपदकासाठी लढणार आहे.

अक्वल मानांकित श्रावणी शेंडे हिने उपांत्य फेरीत हरयाणाच्या तमन्ना गुल्ला हिचा 6-0 गुणफरकाने धुक्वा उडविला. दुसऱ्या उपांत्य लढतीत वैष्णवी पवार हिने झारखंडच्या तमन्ना वर्माचा 7-1 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मानव जाधवने उपांत्य फेरीत पंजाबच्या सुखमनदीप सिंगचा चुरशीच्या लढतीत 148-147 असा निसटता विजय मिळविला. आता सुवर्णपदकाच्या लढतीत त्याची गाठ झारखंडच्या दलवांशू सिंग याच्याशी पडेल. मराठमोळय़ा तेजल साळवेने उपांत्य लढतीत तामीळनाडूच्या मधुरावर्षीनी हिचा 141-139 गुण फरकाने पाडाव करीत अंतिम फेरीत धडक मारली.