
भिवंडी तालुक्यातील अटकाळी गावात अनधिकृतपणे ठाणे पालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेत एमपीसीबीला धारेवर धरले तसेच गावात कचरा टाकण्याची परवानगी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल खंडपीठाने एमपीसीबीला विचारला.
ठाणे महापालिकेला कचऱयासाठी जागा अपुरी पडत असल्याने पालिका प्रशासनाला ठाणे जिल्हाधिकाऱयांकडून भिवंडी तालुक्यातील अटकाळी गावातील भूखंड देण्यात आला. मात्र या कचऱयाचा प्रचंड त्रास होत असल्याचा दावा करत स्थानिक पंचक्रोशी शेतकरी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.