
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्यांनी कश्मीरच्या सीमा भागात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 15 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच पंजाब सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे. बीएसएफच्या गोळीबारात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला आहे. पाकिस्तानी घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अंधाराचा फायदा घेत सुरक्षा कुंपणाकडे जाताना दिसला. बीएसएफच्या जवानांनी चेतावणी दिल्यानंतरही तो पुढे जात होता. त्यामुळे बीएसएफ जवानांनी घुसखोराला गोळ्या घातल्या. बीएसएफने अधिकृत याबाबत माहिती दिली आहे.तत्पूर्वी याच आठवड्याच्या सुरुवातीला बीएसएफने पंजाबच्या गुरुदासपूर जिह्यात एका पाकिस्तानी नागरिकाला हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली अटक केली होती.























































