महाराष्ट्र अलर्ट मोडवर… किनाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ; वरिष्ठ सरकारी अधिकारी, डॉक्टरांच्या सुट्टय़ा रद्द

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलवून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा व अन्य सज्जतेचा आढावा घेतला. महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱयांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या असून सुट्टीवर असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिह्यात मॉकड्रिल घ्या आणि युद्धजन्य स्थितीत ब्लॅकआऊटबाबत जनजागृती करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. दरम्यान, मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून राज्यातील सर्वच किनाऱयांवर करडी नजर ठेवली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी ही तातडीची बैठक बोलवली होती. त्यात संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पोलीस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱयांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभातकुमार, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश…सजग रहा सतर्क रहा

– ब्लॅकआऊटवेळी रुग्णालयांसोबत समन्वय यंत्रणा उभी करा.
– ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशा वेळी काय करावे याचे व्हिडीओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा.
– केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
– महत्त्वाच्या इमारती टार्गेट होऊ नयेत म्हणून वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
– तातडीच्या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱयांना आपात्कालीन निधी दिला. त्याव्यतिरिक्तही निधीसाठी महत्त्वाचे प्रस्ताव आल्यास एका तासात मंजूर करा.

– मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. त्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी करून घ्या.
– पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर बारीक लक्ष ठेवावे. पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
– पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावी आणि गस्त वाढवावी.
– सैन्याच्या तयारीसंबधित चित्रीकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा असून असे आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करा.
– सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी फिशिंग ट्रॉलर्स भाडय़ाने घ्या.
– उदा. विद्युतनिर्मिती, वितरण या अतिमहत्त्वाच्या यंत्रणांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता त्वरित सायबर ऑडिट करून घ्या.

साकीनाक्यात ड्रोनच्या अफवेने पोलिसांना घाम फुटला

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आज पहाटे फोन खणखणला. साकीनाका येथील गैबन शाह बाबा दर्ग्याजवळ ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे तपास यंत्रणांना घाम फुटला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. ड्रोनची केवळ अफवा असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सोशल मीडियावरचे जुने व्हिडिओ व्हायरल होऊन त्यातून तणाव आणि भीतीचे वातावरण पसरू शकते. त्यामुळे अशा व्हिडिओवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे.

द वायरची वेबसाईट ब्लॉक केली

वृत्त सेवा देणाऱया ‘द वायर’ या संकेतस्थळाने चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचा दावा करत पेंद्र सरकारने आयटी कायद्याअंतर्गत द वायरची सेवा बंद केली. ‘द वायर’ने याबाबत निवेदन जारी करत पत्रकारितेच्या अधिकारांवर पेंद्र सरकारने गदा आणल्याचा आरोप केला व निषेध नोंदवला. त्यानंतर काही तासांतच ‘द वायर’ची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडियासह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला असून शुक्रवारी नाशिकच्या गोदाघाटावरील श्रीरामकुंड येथे मॉकड्रिल घेत लोकांना सतर्क करण्यात आले.