पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसल्याने विलेपार्लेत पावसाळापूर्व कामांचा बट्ट्याबोळ! तुंबलेले नाले, कचऱ्याचे ढीग आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मनस्ताप

पालिकेच्या के/पूर्व विलेपार्ले, अंधरी विभागातील पावसाळापूर्व कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अजूनही अनेक नाले गाळाने तुंबलेले असून कचऱ्याचे ढीग आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे के/पूर्व विभागासाठी पालिकेने पूर्णवेळ सहायक आयुक्त द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

के/पूर्व विभागात सध्या ‘बी’ विभागाची पूर्णवेळ जबाबदारी असलेले सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडेच के/पूर्व विभागाचा अतिरिक्त चार्ज सोपवण्यात आला आहे. विलेपार्लेत जैन मंदिर पाडकाम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी तत्कालीन सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यांचा पदभार सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर तर 1 मेपासून के/पूर्वची जबाबदारी शुक्ला यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. या ठिकाणी 15 दिवसांत दोन सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली. मात्र यामुळे विलेपार्लेत पावसाळापूर्व कामे रखडली असल्याचे शिवसेना विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी सांगितले असून या ठिकाणी पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त देण्याची मागणी केली आहे.

अशी रखडली कामे

विलेपार्लेत अनेक ठिकाणची नालेसफाई अद्याप झालेली नाही. रस्त्याची कामे बहुतांशी ठिकाणी अद्याप अर्धवट आहेत. बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. के/पूर्व विभागातील विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वमध्ये नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही नितीन डिचोलकर यांनी सांगितले आहे.