
कधी वाघिणीला शिकार करताना बघितलंय? तिच्या नुसत्या डरकाळीने भीतीची गाळण उडते. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये जेनिफर हेडली या फोटोग्राफर महिलेने हा दुर्मीळ क्षण कॅमेऱ्यात टिपलाय. वाघिणीची अद्भुत उडी तिने कॅमेराबद्ध केली. हा फोटो आणि त्यातील देखणी राणी सोशल मीडियावर सनसनाटी ठरतेय.
जेनिफरने वाघिणीच्या फोटोमागची कहाणी सांगितली. वाघिणीने शिकारीपूर्वी सुकलेल्या एका झाडावरून खाली उडी मारली. खाली झेपावली. तिची शक्ती, स्फूर्ती आणि शिकारचा संयम… सगळं बघण्यासारखं होतं, असे जेनिफरने म्हटलंय.
इन्स्टाग्रामवरील हा फोटो गेल्या काही दिवसांपासून जोरदार व्हायरल होत आहे. निसर्गाचे सुंदर दृश्य, जबरदस्त शॉट असे म्हणत अनेकांनी फोटोचे कौतुक केले.
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आपल्या देशातील सर्वात जुने पार्क आहे. व्याघ्र संवर्धनासाठी ते ओळखले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात सफारीसाठी येतात. वाघांची वाढती संख्या आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जात आहेत. व्हायरल फोटोने पुन्हा एकदा वन्यजीव संपदेकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदुस्थानचे समृद्ध निसर्ग वैभव त्यातून दिसून येते.



























































