Bhargavastra Missile : हिंदुस्थानने केली स्वदेशी ‘भार्गवास्त्र’ची यशस्वी चाचणी, ड्रोनचा हवेतच होणार भुगा!

हिंदुस्थानने ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी एका नव्या आणि स्वदेशी काउंटर ड्रोन सिस्टम ‘भार्गवास्त्र’ची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) यांनी विकसित केलेली ही कमी किमतीची हार्ड किल मोडमधील सिस्टम ड्रोन हल्ल्याच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी एक मोठे पाऊल मानली जात आहे.

ओडिशातील गोपालपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजवर 13 मे रोजी याच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, प्रत्येकी एक रॉकेट डागून दोन चाचण्या घेण्यात आल्या. एक चाचणी दोन सेकंदात साल्वो मोडमध्ये दोन रॉकेट डागून घेण्यात आली. सर्व रॉकेटनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि आवश्यक प्रक्षेपण मापदंड साध्य केले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले रोखता येतील.

6 ते 10 किमी अंतरावरून शत्रूला ओळखणार

भार्गवस्त्र ही एक बहुस्तरीय अँटी-ड्रोन सिस्टम आहे, जी वेगाने येणाऱ्या अनेक ड्रोनना शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. ही अँटी-ड्रोन सिस्टीम 6 ते 10 किलोमीटर अंतरावरून त्या ड्रोनना शोधू शकते, जे इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR) सेन्सर्स, रडार आणि आरएफ रिसीव्हरने सुसज्ज आहेत. तसेच भार्गवस्त्र 2.5 किमी अंतरावर ड्रोन नष्ट करू शकते. ज्याची प्राणघातक मारक क्षमता 20 मीटर आहे.

दरम्यान, भार्गवस्त्र हे समुद्रसपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंतच्या क्षेत्रांसह विविध भूप्रदेशांमध्ये तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही ड्रोन सिस्टम हिंदुस्थानी सैन्याच्या गरजा पूर्ण करू शकते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने ज्या पद्धतीने तुर्की आणि चिनी ड्रोनचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, भविष्यात हिंदुस्थानला अशा प्रकारचे नवीन अँटी-ड्रोन सिस्टम कामी येऊ शकते.