हिंदुस्थानी वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री, गीतेवर हात ठेवून घेतली शपथ

हिंदुस्थानी वंशांच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाली. अनिता आनंद यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला आहेत. पंतप्रधान कार्नी यांच्यासोबत काम करताना चांगले आणि सुरक्षित जग बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅनडामध्ये लिबरल सरकारची स्थापना झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. अनिता आनंद यांची मेलोनी जोली यांच्या जागी परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेलोन जोली यांना उद्योगमंत्री बनवण्यात आलंय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाविरोधी आर्थिक धोरणांमुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव निर्माण झाला आहे. अशा वेळी अनिता आनंद यांच्या नेमणुकीला विशेष महत्त्व प्राप्त होते. या आव्हानांना नवीन धोरणात्मक दृष्टिकोनातून हाताळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.