चिंचवडमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला, वर्दळ नसल्यामुळे अनर्थ टळला; नागरिक संतप्त

पुणे महामेट्रोकडून पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम सुरु असताना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे मंगळवारी (दि. 13) रात्री उशिरा निर्माणाधीन मेट्रो पिलरचा लोखंडी सांगडा कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, रात्रीची वेळ आणि रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे पुढे निगडीपर्यंत विस्तारीकरण होत आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका उभारली जात असून त्यासाठी पिलर उभारणीचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. चिंचवड स्टेशन येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मेट्रोसाठी उभारल्या जात असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला. हजारो टन वजनाचा हा सांगाडा रात्री अचानकपणे कोसळला. सुदैवाने हा सांगाडा ग्रेड सेपरेटरच्या बाजुने कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पडलेला सांगाडा तातडीने हलविण्यात आला. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.