पॉलिटेक्निकसाठी एक लाख तर आयटीआयच्या दीड लाख जागा, ऑनलाईन प्रक्रियेतून एकूण अडीच लाख जागा उपलब्ध

दहावीचा निकालानंतर आता अकरावी, पॉलिटेक्निक आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन आहे. राज्यात 350 पॉलिटेक्निकमध्ये एक लाख सात हजार तर ‘आयटीआय’प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध आहेत. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ‘डीव्हीईटी’ने केले आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी, डिप्लोमा आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रिया वेग घेणार आहे. येत्या आठवड्यात तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये नोंदणी प्रकिया सुरू होणार आहे. या वर्षापासून सहा नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

19 मेपासून ऑनलाईन नोंदणी

राज्यात यंदा सर्व ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असून विद्यार्थ्यांना येत्या 19 मेपासून ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in ही स्वतंत्र वेबसाइट कार्यन्वित केली आहे.

अशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाणार

राज्यातील सुमारे 11 हजार 700 ज्युनिअर महाविद्यालयांमधील अकरावीच्या सुमारे 16 लाख 76 हजार जागांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा विद्यार्थ्यांना एका अर्जातच विविध भागांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली संबंधित जिह्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.