आयपीएलचा थरारक उत्तरार्ध आजपासून, कोलकात्यावर विजय मिळवत बंगळुरूला प्ले ऑफ गाठण्याची संधी

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीनंतर आयपीएलच्या थराराला आठ दिवसांचा क्रिकेटविराम देण्यात आला होता. मात्र आता चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यातील हायव्होल्टेज लढतीने आयपीएलच्या थरारक उत्तरार्धाला प्रारंभ होणार आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बंगळुरू कोलकात्यावर मात करून सर्वप्रथम प्ले ऑफ गाठतो की कोलकाता आपले प्ले ऑफच्या आशा उंचावतो, याकडे आयपीएलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच विराट उद्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे कोलकाताविरुद्ध विराटची बॅट तळपणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, तर युद्धजन्य परिस्थितीनंतर सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोणत्या नव्या परदेशी खेळाडूंना ‘बदली’ म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये आहे.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयपीएलला अनपेक्षित आठ दिवसांची विश्रांती देण्यात आली. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बंगळुरू आणि केकेआर या दोन्ही संघांना उद्याच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. आरसीबी 11 सामन्यांतून 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र उद्याच्या सामन्यातील विजय हा बंगळुरूचे प्ले ऑफचे तिकीट पक्के करू शकतो. दुसरीकडे, केकेआर 12 सामन्यांतून 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यासाठी उद्या केकेआरला विजय अनिवार्य आहे. जर केकेआरचा पराभव झाला तर प्ले ऑफच्या आशा धुसर होण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सामन्यातील दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रजत पाटीदारने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर सर्वांच्याच नजरा असणार आहे. फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, टीम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रोमारियो शेफर्ड या परदेशी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे आरसीबीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, देवदत्त पडिकल आणि जोश हेझलवूड यांच्या दुखापती संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. पडिकलच्या जागी मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर हेझलवूडच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम आहे.