
गेली पाच वर्षे नीरज चोप्रा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो 90 मीटर भालाफेकीचा पराक्रम त्याने दोहा डायमंड लीगच्या अंतिम फेरीत रचला. मात्र जर्मनीच्या ज्युलियन वेबरने सहाव्या आणि शेवटच्या फेरीत 91.06 मीटर भालाफेक करत ही लीग जिंकली.
हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने जगातील अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णविजेती कामगिरी केली, पण त्याला कधीही 90 मीटरचा टप्पा गाठता आला नव्हतो. मात्र आज त्याने आपल्याच सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकताना तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर फेक करून अव्वल स्थान पटकावले होते. त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 88.44 मीटर भालाफेक करत जबरदस्त सुरुवात केली होती, मात्र दुसरा प्रयत्न अपयशी ठरला.
यादरम्यान ज्युलियन वेबरने तिसऱ्या प्रयत्नात 89.06 मीटर भालाफेक करत आघाडी मिळवली, पण त्याच्यामागे फेकीसाठी आलेल्या नीरजने 90.23 मीटर हे विक्रमी अंतर गाठत पुन्हा अव्वल स्थान काबीज केले. त्यानंतर पाचव्या प्रयत्नापर्यंत नीरजच आघाडीवर होता. त्याचे सुवर्ण पक्के मानले जात होते. पण सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात वेबरने 91.06 मीटर फेक करत नीरजला मागे टाकले आणि सुवर्णही जिंकले. विशेष म्हणजे वेबरने आपले सहाही प्रयत्न यशस्वी फेक केली आणि त्यापैकी चार प्रयत्नांत त्याने 88 मीटरपेक्षा अधिक दूर फेक केली हे विशेष.