
>> एकनाथ आव्हाड
“दादा, ही आजच्या पेपरमधली जाहिरात वाचलीस का? अरे तुझ्या आवडीची आहे. दिवाकरांच्या नाटय़छटा स्पर्धेची. ‘बोलावणं आल्याशिवाय नाही’ ही दिवाकरांची नाटय़छटा तू शाळेच्या गॅदरिंगमध्ये किती छान सादर केली होतीस. मला वाटतं तू या स्पर्धेत भाग घ्यायला हवा.’’
सुयशने होकार देत बाबांना ते पुस्तक आणायला सांगितले. त्याचा उत्साह पाहून बाबा म्हणाले, “मी काय म्हणतो तू बालनाटय़ शिबिराला का नाही जात? नाटय़संस्कार कला अकादमीचं बालनाटय़ शिबीर खूप छान असतं असं म्हणतात. तिथे नुसता अभिनयच नाही शिकवत तर अभिनयाचे विविध प्रकार, नऊ रसांची ओळख, बालनाटय़ाचे प्रकार, उच्चारशास्त्रशिवाय नेपथ्य, लाइट्स, रंगभूषा व वेशभूषा यांचीही माहिती देतात. सांग तुझी इच्छा असेल तर तुझी फी भरतो मी.’’
सुयश पटकन म्हणाला, “हो बाबा, नक्की जाईन मी. सुलभाही येईल माझ्यासोबत. नाटय़छटा स्पर्धेसाठी मला या शिबिराचा उपयोग होईल.’’
संध्याकाळी बाबा आठवणीने दिवाकरांच्या नाटय़छटांचे पुस्तक विकत घरी घेऊन आले. रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर सुयशने त्या पुस्तकातील दिवाकरांनी पहिली लिहिलेली ‘महासर्प’ ही नाटय़छटा सर्वांना वाचून दाखवली. दुसऱया दिवशीच बाबा सुलभा आणि सुयशचे नाव बालनाटय़ शिबिरात नोंदवून आले. पंधरा दिवसांच्या या शिबिरात बालनाटय़ातील अनेक नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. शिबिराची सांगता एका बालनाटय़ाने होणार होती. मुलांसाठी एक नाटक बसवण्यात आले. नाटकाचे नाव कुतूहल वाढवणारे ‘तिळा तिळा दार उघड‘ असे होते. या नाटकात सुयश प्रमुख भूमिकेत होता. नाटकातली गोष्ट तो कुणालाच सांगत नसे. हेतू एवढाच, की प्रत्येकाने हे नाटक पाहायला यावे.
नाटकाच्या तालमी जोरदार सुरू झाल्या होत्या. नाटकाच्या तालमीसाठी सुयश सायकलवरून जात असे. एकदा सुयशला नाटकाच्या तालमीसाठी निघायला घरातून उशीर झाला. आता आपण वेळेवर पोहोचणार नाही हे सुयशच्या लक्षात आले. म्हणून लवकर पोहोचण्यासाठी त्याने एक भलताच शॉर्टकट रस्ता लवकर निवडला. सायकल जोरात चालवता चालवता लवकरच त्याच्या लक्षात आले की, हा रस्ता काही बरोबर नाही. सुयश त्या रस्त्यावरून थोडा पुढे गेला असेल तेवढय़ात त्याची सायकल समोरून येणाऱया वाहनाला धडकली. सायकल पडली. तोही सायकलवरून खाली पडला. त्याच्या पायाला दुखापत झाली. हाताला थोडे खरचटले. हा शॉर्टकट त्याला फारच महागात पडला. त्याच अवस्थेत तो नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी पोहोचला. तिथल्या सरांनी त्याच्या आई-बाबांना बोलावून घेतले. बाबा त्याला म्हणालेच, “सुयश, तालमीला थोडा उशीर झाला असता तरी चाललं असतं. पण शॉर्टकट शोधण्याच्या नादात मोठा अपघात झाला असता तर. यापुढे काळजी घे.’’
सुयशचे नाटकाच्या तालमीला जाणे आता बंद झाले. नाटक तोंडावर आले होते आणि आपण तालमीला नाही, ही गोष्ट सुयशला बोचत होती, अस्वस्थ करत होती. या नाटकात आपली मुख्य भूमिका आणि आता आपणच या नाटकात नाही याचे त्याला वाईट वाटत होते. नाटक बसवणाऱया सरांनासुद्धा आता ऐनवेळी सुयशच्या जागी कोणाला घ्यावे ही चिंता होतीच.
शेवटी सुयशने निश्चय केला आपण नाटकाच्या तालमीला जायचेच. त्याने आईला सांगितले, “आई, नाटकाच्या तालमीला मी रिक्षाने जाईन. मला आधार द्यायला सुलभाला माझ्यासोबत नेईल. मला घरी नुसतं बसून खूप कंटाळा आलाय. त्यापेक्षा तालमीत माझं मन रमेल. प्लीज नाही म्हणू नकोस.’’
आईने त्याला परवानगी दिली. सुयशला खूप आनंद झाला. सुयश आपला दुखरा पाय घेऊन सोबत सुलभाला नेऊन नाटकाच्या तालमीला जाऊ लागला. मेहनत घेऊ लागला.
शेवटी नाटक सादर करण्याचा दिवस उजाडला. सुयशने आपला पाय दुखत असतानाही नाटकात आपले काम चोख बजावले. अप्रतिम अभिनय केला. सगळ्यांनी त्याच्या कामाचे खूप कौतुक केले.
दुसऱयाच दिवशी त्याची नाटय़छटा स्पर्धादेखील होती. ही नाटय़छटा सादर करताना बालनाटय़ शिबिराचा त्याला खूपच उपयोग झाला. या नाटय़छटा स्पर्धेत त्याचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला. दुग्धशर्करा योगच जणू दोन दिवसांत घडून आला. तो घरात सगळ्यांना म्हणाला, “या शिबिरातून मी दोन गोष्टी शिकलो एक म्हणजे समजून उमजून अभिनय करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी शॉर्टकट नाही शोधायचा.’’
आई-बाबांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुलभाने तर आनंदाने टाळ्याच वाजवल्या.
[email protected]