
नीट-यूजी परीक्षेच्या निकालाला दिलेली अंतरिम स्थगिती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अखेर मागे घेतली. इंदूरमधील काही केंद्रे वगळता देशभरात झालेल्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्याचे आदेश न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) दिले आहेत.
न्या. सुबोध अभ्यंकर यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एनटीएकडून बाजू मांडली. आमचे म्हणणे ऐकून न घेताच निकालाला स्थगिती देण्यात आली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे इंदूरमधील काही परीक्षा केंद्रांवर अडथळा निर्माण झाला. मात्र संपूर्ण देशातील अन्य केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली आहे. संपूर्ण देशातील निकाल रोखणे व्यवहार्य नाही, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश एनटीएला दिले. मुख्य याचिकेवरील पुढील सुनावणी 19 मे 2025 रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण
4 मे रोजी नीटची परीक्षा झाली. इंदूरमधील काही केंद्रांची वीज अचानक गेली. मेणबत्तीच्या उजेडात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. येथील विद्यार्थ्यांनी अॅड. मृदुल भटनागर यांच्या मार्फत न्यायालयाचे दार ठोठावले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एनटीएकडून याचा खुलासा मागवला व नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई केली.