
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी किंवा युद्धविराम आज संपणार, आता पुढे काय अशा बातम्या प्रसारमाध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून सीमेवरील राज्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत आता हिंदुस्थानी लष्करानेच स्पष्टीकरण दिले असून दोन्ही देशांमधील युद्धविराम अनिश्चित काळासाठी आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन लष्कराने केले आहे.
आज डीजीएमओ स्तरावरील चर्चेबाबतही लष्कराने आपली प्रतिक्रिया दिली. 12 मे रोजी डीजीएमओ चर्चेत ठरल्याप्रमाणे युद्धविराम पुढेही सुरू ठेवण्याबाबत कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, असे लष्कराने सांगितले. दरम्यान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने सिंधू जल करार स्थगित करून जोरदार दणका दिला. पाणी बंद झाल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असून सिंधू जल कराराचा वाद शक्य तितक्या लवकर सोडवला नाही तर युद्धविराम मोडण्याची धमकी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.




























































