
हरियाणातील सोनीपत जिल्हा न्यायालयाने अशोका विद्यापीठातील राजकीय शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अली खान महमूदाबाद याला ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवले आहे. हरियाणा पोलिसांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीनंतर त्याला आज न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने महमूदाबाद याला 27 मे पर्यंत न्यायिक कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला आहे.
प्रकरण काय आहे?
अली खान महमूदाबाद याला 18 मे रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर ऑपरेशन सिंदूर या जम्मू-काश्मीरमधील लष्करी कारवाईसंदर्भात केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्याने ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेत सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या महिला अधिकाऱ्यांबाबत टिप्पणी केली होती, जी हरियाणा राज्य महिला आयोगाने लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणारी आणि सांप्रदायिक असंतोष पसरवणारी असल्याचं म्हटलं होतं.
महमूदाबाद याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 152 (देशाची सार्वभौमता, एकता आणि अखंडता धोक्यात आणणे), कलम 196 (सांप्रदायिक तेढ वाढवणे), आणि इतर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.