काँग्रेस-भाजपमध्ये पोस्टर वॉर; दोन्ही पक्षांचा ऑपरेशन सिंदूरवरून हल्ला आणि प्रतिहल्ला

हिंदुस्थानने दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर आता यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो भाजपने एडिट करून शेअर केला आहे. प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो एडिट करून शेअर केला.

राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर भाजप स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारवर टीका करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते की, “परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय. पाकला अधीच अलर्ट केल्यामुळे आपण किती हिंदुस्थानी विमानं गमावली, हे मी पुन्हा विचारतो. ही चूक नव्हती. हा गुन्हा होता आणि सत्य देशाला कळायला हवं.”

यानंतर आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी X वर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची तुलना असीम मुनीरशी केली आहे. यावर प्रतिहल्ला करत बिहार काँग्रेसच्या अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो एडिट करून शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे की, “एक बिरयानी देश पर भारी.”