
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) देशविरोधी सायबर कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली नाडियाद येथून एका संशयिताला अटक केली आहे. जसीम अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. त्याला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही मोठ्या सायबर कटात सहभागी असल्याचा संशय आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थान सरकारच्या वेबसाइटना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात दोघेही सहभागी होते. हिंदुस्थानी वेबसाइटवर डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ले सुरू करण्याचा आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानाविरुद्ध पोस्ट करण्याचा आरोप आहे.
नाडियाद येथील रहिवासी १८ वर्षीय जसीम शाहनवाज अन्सारी आणि अल्पवयीन मुलगा अॅनोन्सेक नावाचा टेलिग्राम ग्रुप चालवत होते. त्यांनी विविध हिंदुस्थानी वेबसाइट्स बंद करण्यासाठी डीडीओएस हल्ले केल्याचा आरोप आहे आणि ग्रुपमधील भडकाऊ संदेशांसह वेबसाइट्स बंद असल्याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते. ज्या साइट्सना लक्ष्य केले गेले त्यात आधार कार्ड पोर्टलचाही समावेश होता. जो त्यांनी हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तपासकर्त्यांनी उघड केले की दोन्ही आरोपी दहावी उत्तीर्ण आहेत. यांनी YouTube ट्यूटोरियल आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हॅकिंग शिकल्याचा आरोप आहे.
मर्यादित औपचारिक शिक्षण असूनही, त्याने सायबर घुसखोरी करण्यासाठी महत्त्वाचे तांत्रिक ज्ञान मिळवले असल्याचे मानले जाते. सध्याच्या घडीला या घटनेचा अधिक तपास गुजरात एटीएस करत आहे. सायबर हल्ल्याची संपूर्ण व्याप्ती आणि त्यात सहभागी असलेल्या नेटवर्क्सची अद्याप चौकशी सुरू आहे.
गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानी वेबसाइट्स हॅक झाल्याची गुप्त माहिती इन्स्पेक्टर डीबी प्रजापती यांना मिळाली होती. संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली होती. तपासानंतर, जसीम आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आणि त्यांचे मोबाइल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) मध्ये पाठवण्यात आले होते. चौकशीदरम्यान असे आढळून आले की जसीम आणि दुसरा अल्पवयीन दोघेही बारावीत नापास झाले होते परंतु त्यांना एन्क्रिप्टेड चॅट हॅक करण्याचे ज्ञान होते. आरोपींना ऑपरेशन सिंदूरशी संबंधित शत्रुत्व असल्याचे उघड झाले.