
पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी किंवा आपत्कालीन घोषणा करण्यासाठी मराठवाडा पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत. मराठवाडय़ातून गोदावरी, पूर्णा, दुधना, पेनगंगा, मांजरा आणि तेरणा यासारख्या प्रमुख नद्या वाहतात. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव अशा आठ जिह्यांचा समावेश आहे. 2005 पासून नदीकाठच्या गावांमध्ये पूर येतोय. पूरस्थितीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले जातात. पूरसदृश्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत धोक्याचा इशारा देणाऱया घोषणा पोलीस करतात. गावागावांमध्ये दवंडी पिटवली जाते. मात्र वेळेत गावकऱयांपर्यंत पोचणे आवश्यक असते. अशा घोषणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यास उत्सुक असल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीमार्फत ड्रोन खरेदी करण्याची योजना असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश पुमार यांनी सांगितले.परवानगी मिळाली की ड्रोन नदीकिनारच्या भागात तैनात केले जातील, असे ते म्हणाले.