सरपंचाने अख्खी ग्रामपंचायत ठेवली गहाण, मध्य प्रदेशात धक्कादायक प्रकार

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. करोद गावच्या सरपंचाने 20 लाख रुपये कर्जासाठी अख्खी ग्रामपंचायत एका ठेकेदाराला चालवायला दिली. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर सरपंच महिलेला पदावरून हटवण्यात आले.

करोद ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मीबाई आणि ग्रामपंचायत सदस्य असलेला स्थानिक ठेकेदार रणवीर सिंह कुशवाह यांच्यात एक डील झाली होती. गावचे सरपंच पद महिला आरक्षित होते. ठेकेदार कुशवाह याने 20 लाख रुपयांचे कर्ज लक्ष्मीबाईला दिले. तसेच प्रत्येक कामाच्या ठेक्यामध्ये लक्ष्मीबाईला 5 टक्के कमिशन देणार असेही ठरले होते. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 28 नोव्हेंबर 2022 रोजी हा करार झाला होता. सरपंच लक्ष्मीबाईने 20 लाखांचे कर्ज घेऊन ग्रामपंचायत ठेकेदाराला चालवायला दिली. सरपंचाचे चेकबुक, ग्रामपंचायतीचा स्टॅम्प आणि अन्य कागदपत्रे तिने ठेकेदराकडे सुपूर्द केली. या प्रकरणाची चौकशी होऊन सरपंच लक्ष्मीबाईला पदावरून हटवण्यात आल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी किशोर कुमार कान्याल यांनी सांगितले.