अवकाळी पावसाने घात केला… चार महिन्यांत एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महायुती सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱयांना कर्जमाफी दिली नाही. त्यातच अवकाळीने थैमान घातल्याने पिके उद्ध्वस्त झाली. सरकारी नुकसानभरपाईही मिळालेली नाही. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात तब्बल एक हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात अवकाळीसह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 54 हजार 533 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केलेले नाहीत. त्यातच मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या नुकसानापोटी भरपाई म्हणून शेतकऱयांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये वाटप होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड नैराश्य असून त्या निराशेपोटीच शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चार महिन्यांत एक हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची माहिती देतानाच नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिह्यात मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.