
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड आज झाला. शासनाच्या अंदाज समितीतील दहा आमदारांना देण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱयांनी पाच कोटींचा मलिदा आणला होता. त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसैनिकांनी धडक दिली आणि ज्या खोलीत वसुली सुरू होती त्या 102 क्रमांकाच्या खोलीला शिवसैनिकांनी टाळे ठोकले. त्यानंतर तिथेच ठिय्या देत जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच ही खोली उघडावी, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
अनिल गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱयांनी या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे. जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी अशी मागणी शिवसैनिकानी केली. याबाबत पोलीस अधीक्षक तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागालाही कळवण्यात आले मात्र, चार ते पाच तास उलटून गेल्यानंतरही कुणीच तिकडे फिरकले नाही.
सकाळपासून थैल्या घेऊन अधिकारी येत होते!
राज्य सरकारची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱयावर आली होती. या समितीला मलिदा देण्यासाठी जिह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱयांनी पैसे गोळा केले आणि ते विश्रामगृहावर आणले असा दावा अनिल गोटे यांनी केला. 102 नंबरच्या खोलीमध्ये हे पैसे असल्याचा गोटे यांचा आरोप आहे. या समितीच्या लोकांना भेटण्यासाठी सकाळपासून वेगवेगळ्या खात्यातील लोक येत होते आणि ते थैल्या देऊन जात होते असाही दावा गोटे यांनी केला.
शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष असून शिवसैनिकांची धाड पडण्याआधी वसुली करणारे सगळेच तिथून निसटले. त्यात मंत्र्याच्या पीएचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे?
धुळे विश्रामगृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. तिथेच आज विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठीही मलिदा जमा करण्यात आला. तेथे शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. त्या खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत. कलेक्टरांच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे. पण सगळेच पळ काढत आहेत, असे नमूद करत महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच, अशी तोफ संजय राऊत यांनी एक्स पोस्टमधून डागली.